Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओटीटी प्लॅटफॉर्म आता केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित आणण्यात आल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या कामाच्या प्रणालीबद्दल लवकरच नियमावली जाहीर करणार आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची माहिती दिली. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही मालिका आणि चित्रपटांबद्दल माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे प्रचंड तक्रारी आल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं.

प्रकाश जावडेकर म्हणाले,”ओटीटी प्लॅटफॉर्मसवरील काही मालिकाबद्दल आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. यावर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सीरिज व डिजिटल न्यूजपेपर्स प्रेस कॉन्सिल कायदा, केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा वा सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत येत नाहीत. त्यांच्या कामासंदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल,” अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

प्रसारमाध्यमांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण नसून, त्यांच्या नियमनासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे ऑनलाइन माध्यमांसाठीदेखील स्वायत्त संस्थांचे नियंत्रण असू शकेल, केंद्र सरकार नियमनाबाबत हस्तक्षेप करणार नसल्याची भूमिका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सुरूवातीला घेतली होती. मात्र, मागील वर्षी अधिसूचना काढून ओटीटी मंचावर केंद्र सरकारने थेट नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Exit mobile version