Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑनलाईन पद्धतीने दोन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव आणि लघु उद्योग भारती, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने २९ व ३० जून २०२० दोन दिवसीय ऑनलाईन पद्धतीने “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. जळगांव जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामधील मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच मोबाईलद्वारे घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे मागील काही दिवसांपासुन अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग हे बंद होते. त्यामुळे बरेचसे परप्रांतीय कामगार/मजूर हे त्यांचे गावी निघून गेले आहेत किंवा जात आहेत. आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहुन कंपन्या औद्योगिक आस्थापनांना व्यवसाय उद्योग हे सुरु करण्यास मान्यता दिली आहे. मात्र काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांकरिता सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसुचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रता धारकांना ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओ कॉन्फरंस (Skype, Whatsapp,Zoom etc) तसेच मोबाईलद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव अ.ला.तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version