Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ए. राजा यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

 

चेन्नई : वृत्तसंस्था । तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच निवडणूक आयोगाने  द्रमुकचे नेते आणि माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यावर कारवाई केली आहे. 

 

ए. राजा यांना द्रमुकच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.  त्यांच्यावर दोन दिवस प्रचाराबंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे द्रमुकला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ६ एप्रिलला तामिळनाडूमध्ये मतदान होत असून दोन दिवस आधी आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे २ दिवसांची प्रचारबंदी पाहाता ए. राजा यांना फक्त दोनच दिवस प्रचार करता येईल, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे!

 

 

द्रविड मुन्नेत्र कळघमचे स्टार प्रचारक ए राजा यांनी  तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. “स्टॅलिन यांनी १ वर्ष तुरुंगात काढलं आहे. ते जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. जनरल कौन्सिलचे सदस्य राहिले आहेत. युवा संघटनेचे अध्यक्ष, नंतर पक्षाचे खजिनदार, पुढे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे असं म्हणता येईल की स्टॅलिन यांचा योग्य पद्धतीने, ९ महिन्यांचा काळ काढून, वैध लग्न-विधीनंतरच (राजकीय विश्वात) जन्म झाला आहे. पण दुसरीकडे इडाप्पडी हे वेळेपूर्वीच जन्मलेले आणि अचानक आलेले मूल आहेत”, असं राजा म्हणाले होते.

 

या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार आगपाखड केली. आपल्या विधानाबद्दल ए. राजा यांनी माफी देखील मागितली होती. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमने राजा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या उत्तरादाखल ए. राजा यांच्याकडून देण्यात आलेल्या खुलाशाने आयोगाचं समाधान न झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

Exit mobile version