Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन

मुंबई : वृत्तसंस्था । ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांची गैरसोय होऊ नये, दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावं यादृष्टीने परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलं.

जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन एसटीच्या एक लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाले नव्हतं. जुलै महिन्याच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ७ ऑक्टोबरला वेतन देण्यात आले. पुढच्या वेतनासाठी राज्य शासनासोबत चर्चा करून लवकरच वेतन देण्याचे आश्वासन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी आश्वासन दिलं होतं.

एसटी कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत एसटी संघटनेच्या प्रतिनिधींनी थकीत वेतनाबाबत चर्चा केली व या समस्येबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली.

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन देण्यात आलं. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळणार कधी?, असा सवाल एसटी कामगार संघटनांनी विचारला होता. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्याप्रमाणे वेतन व भत्ते द्यावे, त्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती. दोन महिन्याचे वेतन तात्काळ मिळावे, शासनाकडून निधी मिळण्यासाठी आदेश देण्याबाबत राज्यपालांकडे चर्चा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली होती.

Exit mobile version