Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथे वाळूची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त

एरंडोल, प्रतिनिधी ।  तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू चोरीप्रकरणी धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत वाळूची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त करण्यात आली आहेत व त्यांच्या मालकांना प्रत्येकी १ लाख २० हजार ६७४ रुपये प्रत्येकी याप्रमाणे दंड भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या. या कारवाईमुळे वाळूमाफीयांची धाबे दणाणले आहेत.

या मोहिमेत मयूर दिनकर पाटील , पंकज भोई , शशिकांत चिंतामण पाटील , चिमणराव नामदेव पाटील या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सदर  वाळू अवैध वाहणाऱ्या वाहनांना महसूल विभागाचे तलाठी  सुधीर मोरे, सलमान तडवी, ठोंबरे , विलास धाडसे या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. तर कार्यालयीन कामकाज योगेश्री तोंडे यांनी पाहिले.  विशेष हे यातील तीन वाहन विना नंबरची आढळून आली आहेत. दरम्यान, कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांनी वाळू चोरी करणाऱ्या एका ट्रॅक्टरला रंगेहाथ पकडून ते वाहन महसूल यंत्रणेच्या ताब्यात दिले.

दरम्यान एरंडोल तालुक्यातील हणमंतखेडे सिम येथील माजी सरपंच किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव, महसूल मंञी , महसूल सचिव , राज्यपाल , लोकायुक्त , पालकमंत्री ( जळगाव ), विरोधी पक्ष नेते , खासदार यांना निवेदनाद्वारे हनुमंतखेडेसिम येथे दिवस – राञ चोरटी वाळु वाहतुक सूरू आहे. गावातील १५ ते २० ट्रॅक्टर व बाहेरगावाचे ट्रॅक्टर्स गिरणा नदी पात्रातुन २४ तास अवैध वाळू वाहतुक करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच संदर्भात अनेकवेळा प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अर्चना खेतमाळीस, जिल्हा गौण – खनिज अधिकारी ( जळगाव ) यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून त्यांनी निवेदने दिली असल्याचे देखील म्हटले आहे.  मोबाइल फोन वरून अनेकवेळा तक्रारी देखील केल्या असल्याचे म्हटले आहे. मात्र माझ्या तक्रारी व निवेदनांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत असे म्हटले आहे.या प्रकरणात पाणी कुठे मुरते ? असा सवाल जिल्हाधिकारी यांना माजी सरपंच किशोर पाटील यांनी निवेदनाद्वारे केला आहे. वाळुचोरी बाबत तक्रारी केल्या कारणावरून वाळुचोरट्यांनी मला दोन वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद केले आहे. गिरणा नदी पात्रातील चोरटी वाळु वाहतुक रोखण्यासाठी महसूल यंत्रणेने नेमलेली पथके काही एक कारवाई करतांना दिसून येत नसल्याचे व ही पथके केवळ कागदावरच दिसून येत असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत लोकप्रतीनिधींनाही सदर प्रकार लक्षात आणून दिला.मात्र तरी सुध्दा चोरटी वाळु वाहतुक लॉकडाऊन काळ असतांना ही सूरू आहे .महाराष्ट्रात इतर ठिकाणी वाळु चोरट्यांविरूध्द कारवाई होते परंतू हनुमंतखेडे सीम् येथील वाळु चोरांवर कारवाई  का होत नाही या मागे नेमके गौडबंगाल काय ? असा सवाल किशोर पाटील यांनी निवेदनात केला आहे . वाळुचोरट्यांना कायद्याची भिती का वाटत नाही का ? असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न , पर्यावरणीय समस्या, रस्त्यांची दैनावस्था या नव्या समस्या चोरट्या वाळु वाहतुकीतून निर्माण झालेल्या असल्याचे देखील त्यांनी निदर्शनात आणून दिले आहे. शेवटी पर्यावरण प्रेमींनी चोरटी वाळू वाहतूक कधी पूर्णपणे बंद होईल ? असा प्रश्न केला आहे.

 

Exit mobile version