Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एम आय एमला बिहारमध्ये ५ जागा

 

पाटणा : वृत्तसंस्था । बिहारमध्ये एक कच्चा राजकीय पक्ष असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने विधानसभा निवडणुकीत ५ जागा जिंकत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यांची ही कामगिरी काँग्रेस आणि महागठबंधनला चांगलीच महागात पडली.

बिहारमधील यशाबद्दल हैदरबादमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं.असदुद्दीन ओवेसी यांनी बिहारमध्ये ६५ सभा घेतल्या. पण सर्वांत महत्वाचं म्हणजे त्यांनी हैदराबादचे माजी महापौर आणि आपले अत्यंत विश्वासू माजीद हुसेन यांना बिहारच्या कामगिरीवर पाठवलं. ४० वर्षीय माजीद यांनी सीमांचललाच दोन महिन्यांसाठी आपलं घर बनवलं होतं. ते स्वतः दोन महिने बिहारमधील बहुसंख्य मुस्लिम भागात रस्त्यावर उतरून प्रचार करीत होते. ते ओवेसींचे जणू प्रत्यक्ष मैदानातील कान आणि डोळेच बनले होते. उमेदवारांच्या निवडीपासून बैठकांचे आयोजन आणि बुथ मॅनेजमेंट या सर्व गोष्टींचं माजीद यांनीच नियोजन केलं होतं.

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात २४ ऑक्टोबर रोजी असदुद्दीन ओवेसी हे सीमांचलमध्ये दाखल झाले. त्यानंतर दहा दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. या काळात त्यांनी हैदराबादमधील ईद-ए-मिलादचा कार्यक्रमही टाळला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ओवेसी यांनी सुमारे ५० सभा घेतल्या.

ओवेसी हे कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये फास्ट बॉलर तसेच बॉक्सरही होते. बिहारच्या निवडणुकीच्या निकालांनी ते राजकीय दृष्ट्या वजनदार व्यक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. दरम्यान, राजदप्रणित महागठबंधनला पाठिंबा द्यायचा किंवा नाही हे एमआयएम नंतर ठरवेल असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version