Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमबीए पूर्ण केल्यानंतर नोकरी व स्वतंत्र व्यवसायाच्या अनेक संधी : तुषार मुळे

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेणे हे आपल्या करिअरच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र याकरता हा अभ्यासक्रम योग्य प्रकारे पूर्ण करणे हे तितकेच आवश्यक आहे हे लक्षात ठेवायला हवे. असे आवाहन डेल कार्निगो सर्टिफाइड सॅाफ्टस्कील ट्रेनर तुषार मुळे यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना केले.

जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश सोहळा अर्थात ‘इंडक्शन- जुनून’ या सोहळ्यात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यानी कोणत्याही बाबतीत संकोच न बाळगता पुढाकार घेऊन नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमुक एखादी गोष्ट मला समजलेली नाही, पण मग मी प्रश्न न विचारता आपले त्या ठराविक बाबतीतील अज्ञान तसेच ठेवतो, हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाठी खूप नुकसानदायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या ‘कॉलेज टू कॉर्पोरेट’ या प्रवासात आपण अधिकाधिक रोजगारक्षम कसे होऊ या दृष्टीने प्रयत्नशील राहायला हवे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत व अस्पष्टतेच्या काळात विद्यार्थ्यानी स्वतःचे करिअर सुरक्षित करण्यासाठी स्वतःला कायम अद्ययावत ठेवणे गरजेचे असून आपल्यातील ज्ञान, कौशल्य व अनुभव वाढवतानाच आपला दृष्टीकोन हा कायम सकारात्मक व सर्वसमावेशक कसा राहील याकडे लक्ष द्यायला हवे असे सांगितले. यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डेल कार्निगो सर्टिफाइड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी नेटवर्क लंच व सायको मेट्रिक टेस्ट या उपक्रमाद्वारे आजचे युवक व्यवसायात व वेयक्तिक आयुष्यात कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतात यांचे मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया यांनी ट्रेझर हंट या मॅनेजमेट गेमच्या सहाय्याने उपस्थित विध्यार्थ्यांना महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. चौथ्या सत्रात प्रा. तन्मय भाले यांनी मॅनेजमेट गेम व पॉवरपाॅईटच्या माध्यमातून उत्तम टीमची उभारणी कशी करावी हे स्पष्ट केले तर पाचव्या सत्रात एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख यांनी व्यवसायाच्या जडणघडनीत अकाऊंट व ताळेबंद यांचा अभ्यास किती महत्वपूर्ण आहे हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून उपस्थित विध्यार्थ्यांना सांगितले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. योगिता पाटील, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. विनोद महाजन व आदी प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यानी विशेष सहकार्य केले.

Exit mobile version