Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयएमच्या धुळे जिल्हाध्यक्षांचा अपघाती मृत्यू

धुळे : प्रतिनिधी । मालेगावहून चाळीसगावकडे जाताना बाईक अपघातात एमआयएमच्या धुळे जिल्हाध्यक्षांना प्राण गमवावे लागले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 58 वर्षीय समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांनी रुग्णालयात जाताना अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुल हुद्दा मोहम्मद शहा चाळीसगावला जाताना अपघात झाला. मालेगाव शहराजवळ चाळीसगाव फाट्यावर त्यांच्या बाईकला ट्रकने धडक दिली होती. समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांच्या निधनाने कुटुंबीय, समर्थक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे.

मालेगावमधील कमलपुरा भागात राहणाऱ्या मोहम्मद जुनेद यांच्यासह समसुल दुचाकीने भंगार माल खरेदीसाठी जात होते. अंबिका हॉटेलच्या बाजूला माल वाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. चेहऱ्यावरुन ट्रकचे टायर गेल्याने जुनेद यांचा जागीच मृत्यू झाला. तर समसुल हुद्दा शहा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जुनेद यांचा मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला, तर जखमी समसुल यांना तातडीने खासगी रुग्णालयाकडे नेण्यात आले. समसुल यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकमधील खासगी रुग्णालयात नेले जात होते. परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ कार आणि ऑईल टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली होती. औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात झाला होता. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतांमध्ये समावेश होता. अपघातातील सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी होते.

Exit mobile version