Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एक लाख कोटींची महसुली तूट भरून काढण्यासाठी मंदिरे उघडा

 

मुंबई, वृत्तसंस्था । अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. धर्माच्या नावानं फार मोठी अर्थव्यवस्था आहे. ती पुनरुजीवित झाली पाहिजे. शासनाला मी आता सांगतोय की, तुमचा एक लाख कोटींचा महसूलाची तूट भरून काढण्यासाठी हे सुरू करा. मंदिरं खुली करण्यासंदर्भात सरकारशी संवाद सुरू आहे. एसओपीबद्दल त्यांचा आराखडा तयार होतोय. कदाचित या आठवड्यामध्ये मंदिरं खुली करण्याचा निर्णय होऊन जाईल,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवण्यासाठी आता राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. “जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता असेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

‘१८० ते १८२ आमदारांना हे आरक्षण नकोय. श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा असं विधान आपण केलं होतं. मराठा आरक्षणाचं भवितव्य आपल्याला काय दिसतं?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,”जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता मिळणार नाही आणि आरक्षणही मिळणार नाही. तेव्हा आता गरीब मराठ्यांनी आता काय भूमिका घ्यायची. त्यांनी त्यांची भूमिका ठरवावी. जातीबरोबर राहायचं की आपल्या आरक्षणाबरोबर राहायचं हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

Exit mobile version