Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एक मार्चपासून ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोव्हिड योद्ध्यांनंतर आता सामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली.

 

सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.  १० हजार सरकारी, तर २०  हजार खासगी केंद्रांवर कोरोना लस उपलब्ध असेल.

 

 

४५ वर्षांवरील सहव्याधी   नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींना सरकारी केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोव्हिड लस घ्यायची असेल, त्यांना लसीचे पैसे मोजावे लागतील. त्या लसीचे दर केंद्रीय आरोग्य मंत्री येत्या तीन-चार दिवसात रुग्णालय प्रशासनांशी बोलून ठरवतील, अशी माहितीही जावडेकरांनी दिली.

 

 

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु आहे. जवळपास ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण ५ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

 

राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोना लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे, असेही राजेश टोपे म्हणाले होते.

Exit mobile version