Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एक देश एक निवडणूक देशाची गरज — मोदी

अहमदाबाद : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीचा उल्लेख करत ती काळाची गरज असल्याचं म्हटलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे संविधान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ही जखम आपण कधीही विसरु शकणार नसल्याचंही म्हटलं. .

“एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला पाहिजे,” असं मोदी यावेळी म्हणाले. “आपण पूर्णत: डिजिटल होण्याकडे वाटचाल करणं आवश्यक आहे. कागदांचा वापरही पूर्णपणे बंद केला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्षाकडे पाहता आपण हे लक्ष्य साधलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

“संविधानाच्या संरक्षणात न्यायपालिकांची भूमिका महत्त्वाची आहे. ७० च्या दशकात ते भंग करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु संविधानानं त्याचं उत्तर दिलं. आणीबाणीनंतर यंत्रणा अधिक मजबूत होत गेली आणि आपल्याला खुप काही शिकायलाही मिळालं,” असंही त्यांनी नमूद केलं. प्रत्येक नागरिकाला संविधान समजून घेण्याची गरज आहे. संविधानाच्याच मार्गानं सर्वांनी चाललं पाहिजे. लोकांना केव्हायसी म्हणजेच ‘नो युअर कॉन्स्टिट्युशन’वर भर देणं आवश्यक आहे. विधानसभेच्या चर्चांदरम्यान जनतेचा सहभाग कसा वाढेल यावर विचार केला गेला पाहिजे. जेव्हा कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते तेव्हा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही बोलावण्यात आलं पाहिजे, असंही पंतप्रधान म्हणाले.

“आज प्रत्येकाला देशाचं हित लक्षात घेऊन काम करणं आवश्यक आहे. अशा मुद्द्यांवर राजकारण झाल्यास त्याचं नुकसानही सोसावं लागू शकतं. यापूर्वी सरदार सरोवर धरणावरूनही राजकारण केलं गेलं. परंतु पाण्याचं काम जेव्हा झालं तेव्हा राजस्थानहून भैरो सिंह-जसवंत सिंह त्यांना भेटण्यासाठी गुजरातमध्ये आले,” असंही त्यांनी नमूद केलं.

Exit mobile version