Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एका क्लिकवर उपलब्ध जागतिक दर्जाची केकी मूस व्हर्चुअल आर्ट गॅलरी

 

 

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  जगप्रसिद्ध छायाचित्रकार कलामहर्षी केकी मूस यांच्या कलाकृती या जगाच्या नकाशावर याव्यात,जगाच्या कानाकोपऱ्यातील कलाप्रेमींना त्या पाहता याव्यात यासाठी कलादालनाच्या वतीने व्हर्च्युअल आर्ट गॅलरीचे निर्मिती करण्यात आली असून तीचा लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्ष तथा कलामहर्षी कै.केकी मूस कलादालन व सांस्कृतिक केंद्राच्या विश्वस्त संपदाताई पाटील यांनी केले. 

 जागतिक दर्जाचे कलाकार बाबूजींचा हा समृद्ध कलाकृतीचा ठेवा व त्यांची जागतिक वारसा स्थळ असलेली अमूल्य इमारत जगाच्या पाठीवर सर्वांना बघता येणार असल्याने चाळीसगाव तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर  झळकणार असल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी  व्यक्त केली. 

आज दुपारी बारा वाजता खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात कलामहर्षी केकी मूस आर्ट व्हर्चुअल गॅलरीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.  सोहळ्याला संस्थेचे सचिव कमलाकर सामंत, संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार संजय सोनार , पारी आघाडीचे अजय वाणी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूदादा पगार, मंदार सामंत ,स्वप्नील देशमुख ,ग्रंथपाल मनोज घाटे, अनिल चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला कलामहर्षी केकी मूस यांच्या जीवन प्रवास तसेच आर्ट गॅलरीविषयी भूमिका मांडली. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून कलामहर्षी केकी मूस आर्ट गॅलरी कलादालन व सांस्‍कृतिक केंद्रासाठी कोट्यवधीचा निधी मिळाला असून  आज येथे भव्य-दिव्य इमारत साकारली गेली आहे. या इमारतीमध्ये जागतिक दर्जाच्या कलाकृतीचा नजराणा भावी कलाकारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे अशी भावना प्रास्ताविकात सचिव कमलाकर सामंत यांनी विशद केली.

 

संपदाताई पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप वरील कळ दाबून आर्ट गॅलरी जागतिक कलाप्रेमींना कलाकृती पाहण्यासाठी सुरू करण्यात आली. याप्रसंगी संपदाताई पाटील पुढे म्हणाल्या की,सध्याच्या कोरोना महामारीमध्ये डिजिटल ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार वेगाने वाढत असताना जागतिक दर्जाची आर्ट गॅलरी एका क्लिकवर जगाच्या कानाकोपऱ्यातील कलाप्रेमीला पाहता येणार आहे. स्व. बाबूजींच्या अनमोल कलाकृती त्यांची जागतिक दर्जाचे छायाचित्रे, विविध पैलूंचे त्यांचे जीवन सचित्र बघावयास मिळणार आहे, जागतिक दर्जाचे कलाकृती देणाऱ्या बाबूजी यांच्या गॅलरीच्या आज जागतिक हेरिटेज दिनानिमित्त लोकार्पण होत आहे. संस्थेचे सचिव कमलाकर सामंत व त्यांचे सर्व सहकारी यांनी हा अमूल्य ठेवा जतन करुन ठेवल्याबद्दल संपदाताई पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.  ज्येष्ठ पत्रकार संजय सोनार यांनी आभार मानले.

 

Exit mobile version