Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकट्याने ३० वर्षे राबून ३ किलोमीटर कालवा खोदला !!

गया (बिहार) : वृत्तसंस्था / दाट जंगलातील छोटेसे गाव…शेती आणि पशुपालनावर ग्रामस्थांची उपजीविका अवलंबून…मात्र, पाण्याअभावी गाव तहानलेले… एका गावकऱ्याने मात्र हार न मानता तब्बल तीस वर्षे एकट्याने राबून तीन किलोमीटरपर्यंतचा कालवा खोदण्याची अशक्यप्राय कामगिरी पार पाडली. आता परिसरातील डोंगरावरून पावसाचे पाणी वाहून न जाता त्यांच्या गावात येणार आहे. एखाद्या चित्रपटात घडेल अशी घटना गया जिल्ह्यातील लाहथुआ येथील कोथिलावा या गावात घडली. आणि ही कामगिरी करणाऱ्या आजोबांचे नाव आहे लौंगी भुईयान.

‘मी गेल्या तीस वर्षांपासून नियमितपणे शेजारच्या जंगलात गुरे चरायला न्यायचो आणि कालव्यासाठी खोदकाम करायचो. या कामात मला कोणीही मदत केली नाही. गावकऱ्यांनी पोटापाण्यासाठी शहर गाठले; पण मी गावातच राहण्याचा निश्चय केला होता,’ असे भुईयान यांनी सांगितले.

कोथिलावा हे गाव गया शहरापासून ८० किलोमीटरवर दाट जंगलात वसलेले असून डोंगररांगांनी वेढलेले आहे. . पावसाळ्यामध्ये डोंगरांवरून वाहत येणारे पाणी नदीला जाऊन मिळायचे, यामुळे भुईयान अस्वस्थ झाले होते. हे पाणी वाचायला हवे आणि त्याचा गावासाठी वापर व्हायला हवा, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. गावात मोठ्या संख्येने असलेल्या गुरांना आणि शेतीला पाणी मिळणार आहे. भुईयान यांचे हे काम फक्त त्यांच्या शेतीपुरते नसून संपूर्ण गावामध्ये यामुळे सुबत्ता येणार आहे, असे पत्ती मांझी या ग्रामस्थाने सांगितले.

Exit mobile version