Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे” — फडणवीस

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । सचिन वाझे यांच्यावरील कारवाईबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. “आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे” असं फडणवीस म्हणाले आहेत.

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका गाडीत आढळलेली स्फोटकं आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मुंब्रा येथे आढळलेला मृतदेह या प्रकरणांमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपाने आक्रमक होत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर काल दिवसभराच्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे.

 

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, ज्यावेळी याचे काही पुरावे माझ्याजवळ आले. त्यावेळी मी ते सभागृहात यासाठीच मांडले. की समजा पोलिसमधीलच लोकं अशाप्रकारे जर काम करणार असतील आणि अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी? म्हणून हा सगळा विषय मी सातत्याने मांडत होतो. परंतु दुर्देवाने सरकारच्यावतीने केवळ त्यांना पाठीशी घालण्याचं काम सातत्याने होत होतं. कुठंतरी त्यांची वकिली करण्याचं काम हे सरकारच्यावतीने सातत्याने होत होतं. मला असं वाटतं की आती जी एनआयएची कारवाई झाली आहे. त्यामध्ये अनेक पुरावे एनआयएला मिळालेले आहेत. कशाप्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडला आहे? हे देखील समोर आलेलं आहे.”

 

माझं मत असं आहे की, अजुन यातला एकच भाग बाहेर आलेला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे, आता तर ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा जो गुन्हा आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात आज एनआयएने आज रिमांड मागितला आहे. परंतु, मनसुख हिरेन हत्याप्रकरण देखील महत्वाचं आहे. त्यामध्येही प्रचंड मोठे धागेदोरे आणि पुरावे हे मला असं वाटतं की, तपासयंत्रणांना उपलब्ध होत आहेत. त्यामध्येही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे.” असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

 

 

फडणवीस म्हणाले, “ हे केवळ सचिन वाझे यांच्या पुरतं मर्यादित नाही. कोण कोण यामाध्ये आहे? कोणाला याचा पाठिंबा आहे? कुणी कुणी काय काय भूमिका निभावली आहे? या सर्व गोष्टी बाहेर येणं आवश्यक आहे. मला असं वाटतं आता ही नुसती सुरूवात झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी हा देखील उपस्थित होतो की, सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खातं होतं, त्यावेळी अशाप्रकारचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होती की, त्यांना पुन्हा घेतलं पाहिजे. म्हणून त्यावेळी मी अॅडव्हकेट जनरल यांना बोलवून ती फाईल दाखवली होती आणि त्यावेळी मला असा सल्ला दिला गेला होता की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते निलंबित झालेले असल्याने त्यांना घेणं योग्य होणार नाही, तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी करोनाचं कारण दाखवून करोनात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असं कारण दाखवून त्यांना पुन्हा घेतलं. क्राईम इंटेलिजन्स युनिट हे मुंबई पोलिसांचं सगळ्या महत्वाचं युनिट आहे. या युनिटचा प्रमुख नेहमी एक पोलीस निरीक्षक दर्जाचा व्यक्ती असतो, यांना घेतल्यानंतर रातोरात पोलीस निरीक्षक दर्जाच्या व्यक्तीची बदली करण्यात आली आणि एपीआय दर्जाचे जे सचिन वाझे आहेत, यांना त्याचा पूर्ण चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुंबईमधील कुठलीही केस असो ती प्रत्येक केस ही त्यांच्याचकडे जाईल, अशाप्रकारचं त्या ठिकाणी काम सुरू झालं. आणि म्हणून त्यांचं जे वाढतं महत्व होतं, सरकारचा जो वाढता पाठिंबा होता किंवा जो सरकारचा वाढता विश्वास त्यांच्यावरती होता. ते शिवसैनिक होते म्हणून होता की काय कारण होतं मला माहिती नाही, परंतु या विश्वासामुळे त्यांना असं लक्षात आलं की आपण काहीही करू शकतो आणि अशा या मानसिकतेमधून हे काम झालेलं आहे, असं मला वाटतं. हे फार गंभीर आहे. या संदर्भात अजून पुढे भरपूर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.”

Exit mobile version