Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमर खालिदला न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी उमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीएए आणि एनआरसीविरोधात निदर्शने करणाऱ्यांना चिथावणी दिल्याचा उमर खालिदवर आरोप आहे. या व्यतिरिक्त दिल्ली हिंसाचाराशी संबंधित विविध प्रकरणांत दाखल आरोपपत्रात खालिदचे नाव आहे.

उमर खालिदला यूएपीए अंतर्गत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. त्याला १३ सप्टेंबरला अटक केली होती आणि २४ सप्टेंबरपर्यंत १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलीस कोठडीत असताना कुटुंबीयांची भेट घेता यावी अशी विनंती करणारी याचिका उमर खालिदने न्यायालयाकडे केली होती. ती न्यायालयाने फेटाळली होती. कुटुंबीयांना दोन दिवस ३० मिनिटे भेटण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती करणारी याचिका त्याने न्यायालयाकडे केली होती. पोलिसांनी कुटुंबीयांना भेटण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र, नंतर त्यांनी नकार दिला, असे खालिदच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

खालिद आणि कुटुंबीयांच्या भेटीमुळे चौकशीवर परिणाम होऊ शकतो आणि अडथळे निर्माण होऊ शकतात, असे विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांनी सुनावणीवेळी सांगितले होते. आरोपी आधीपासूनच आपल्या वकिलांशी चर्चा करत आहे आणि त्याला आपल्या कुटुंबीयांना एखादा संदेश द्यायचा असल्यास तो देऊ शकतो, असा युक्तिवादही त्यांनी केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी १९ सप्टेंबर रोजी त्याची याचिका फेटाळली होती.

Exit mobile version