Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला -शरद पवार

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव  यांच्या  निधनानंतर   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शोकभावना व्यक्त केल्या आहेत. “महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे,” असं म्हणत पवार यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. “काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

सातव यांच्या निधनाच्या वृत्तानंतर खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या. “काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणुसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

 

“काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सोहार्दाचे संबंध होते. ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अपर्ण केली आहे.

Exit mobile version