Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपमुख्यमंत्र्यांकडे एनएसयुआय जिल्हाध्यक्ष मराठे यांनी केली जिल्हा प्रशासनाची तक्रार

जळगाव, प्रतिनिधी । एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी संपर्क करून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या अति गंभीर परिस्थितीचा संपूर्ण आढावा नामदार अजित पवार यांच्याकडे देऊन अधिष्ठाता डॉ. खैरे यांच्या कार्यशैलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे  यांच्याशी चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, जिल्हा प्रशासनाची जबाबदारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या तिघा लोकांवरती असते. परंतु, जळगाव जिल्ह्याची परिस्थिती व येणाऱ्या वारंवार तक्रारींमुळे जिल्ह्यामध्ये प्रशासन अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविंड रुग्णालयात दाखल होणे म्हणजेच वैकुंठधामामध्ये दाखल होण्यासारखे आहे ही सामान्य जनतेच्या मनातील भावना मराठे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मांडली. मराठे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच कोवीड रुग्णालय मधील भोंगळ कारभार व या रुग्णालयांमध्ये होत असलेली रुग्णांची हेडसांड तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाढत असलेल्या रुग्णांची संख्या याबद्दलची सर्व माहिती दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच कोवीड रुग्णालय येथे वारंवार तक्रार करून देखील केवळ आणि केवळ तुटपुंज्या ४० डॉक्टरांवर ती संपूर्ण कोविड रुग्णालयाची जबाबदारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हक्काचे २३५ डॉक्टर कोरोना होण्याच्या भीतीपोटी शासनाचा लाखो रुपयांचा फुकटचा पगार घेत घरात लपून बसलेले असून अधिष्ठाता डॉ. खैरे या सर्व डॉक्टरांना पाठीशी घालत आहेत असा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये उघडकीस आला. २३५ डॉक्टरांना हजर करण्याच्या वाढत असलेल्या दबावामुळे तब्येतीच्या नावाखाली डॉ.खैरे रजा घेऊन घरात बसले. डॉ. खैरे हे जिल्ह्यात निर्माण झालेल्या अतिगंभीर परिस्थितीला जबाबदार असल्याने त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केलेली होती व मिळालेल्या माहितीनुसार डॉ. खैरे यांची बदली झालेली असून लवकरच नवीन अधिष्ठाता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपला पदभार स्वीकारतील अशी माहिती देवेंद्र मराठे यांनी दिली.  परंतु,  जरी अधिष्ठाता बदलले तरी सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजूनही कोरोनाच्या या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये गंभीर नाहीत व संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाँकडाउन चा फज्जा उडालेला दिसून येतो आहे.

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
या संपूर्ण प्रकाराची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती जाणून घेतल्यानंतर ते पुढे बोलले की, या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार असलेल्या बेजबाबदार व आपली सेवा न देणाऱ्या या संपूर्ण डॉक्टरांवर लवकरच कठोर कारवाई करण्याचे आदेश देतो व आपणही जिल्ह्यातील नागरिकांना व आपल्या संपर्कातील नागरिकांना लॉक डाऊन या नियमांचा कडेकोट पालन करण्याचे आवाहन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगितले.

Exit mobile version