Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपमहापौरांचा स्वत:च्या प्रभागात दौरा ; नागरिकांनी केले स्वागत

 

जळगाव, प्रतिनिधी ।उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपमहापौर सुनील खडके यांनी स्वतःच्या प्रभाग १७ चा दौरा केला.

नागरिकांशी चर्चा करताना नगरसेवक म्हणून सुनील खडके नेहमीच तत्पर असून प्रभागातील बरीच कामे मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

दौऱ्याप्रसंगी त्यांच्यासोबत नगरसेवक डॉ. विरेन खडके, रंजना वानखेडे, मिनाक्षी पाटील, मनोज आहुजा, प्रवीण कोल्हे, भरत सपकाळे, मनोज काळे, प्रदीप रोटे, किसनराव मराठे, चंदन महाजन, विजय वानखेडे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

ठिकठिकाणी स्वागत

प्रभाग १७ च्या पाहणी दौऱ्याला गोपाळपुरा येथील विठ्ठल मंदिरापासून सुरुवात झाली. नागरिकांनी फटाके फोडून आणि पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन उपमहापौर सुनील खडके व नगरसेवकांचे स्वागत केले. नागरिकांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.

रामचंद्र नगरातील श्री दत्त मंदिराचे भूमिपूजन
रामचंद्र नगरातील मनपाच्या मोकळ्या जागेवर श्री गुरुदत्त, शिवशंकर, मारुती मंदिर उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मंदिराचा प्रश्न उपमहापौर सुनील खडके यांनी मार्गी लावला. मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार असलेल्या उपमहापौर सुनील खडके यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि कुदळ मारून मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. मंदिराच्या दोन्ही बाजूला गटारींचे बांधकाम करावे, परिसरातील धोकादायक झाडाच्या फांद्या छाटाव्या, ओपन स्पेस साफ करून मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली असता उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना ताबडतोब सूचना केल्या.

अयोध्या नगरातील उद्यान विकसित करावे

अयोध्या नगरात दोन ठिकाणी उद्यान तयार करण्याचे काम सुरू असून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. दोन्ही उद्याने विकसित करून घ्यावे, त्याठिकाणी ओपन जीम सुरू करण्यात यावी, उद्यानाची वेळ निश्चित करणारा फलक लावावा अशी मागणी नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी असे सांगितले.

अशोक नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गटारींचे काम करण्यात आलेले नसल्याची समस्या नागरिकांनी मांडली. तसेच काही ठिकाणी अमृत योजनेचे पाईपलाईन टाकण्यात आलेली नसून काही पथदिवे देखील बंद आहेत अशी व्यथा श्री दत्त मंदिर परिसरातील नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी कोणत्याही निधीतून गटारींचे काम प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. परिसरातील एका मोकळ्या जागेच्या सभोवताली गटारी नसल्याने पाणी तुंबत असून त्याठिकाणी योग्य ती व्यवस्था करावी असेही उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले.

Exit mobile version