Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे

 

जळगाव, प्रतिनिधी । औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास सर्व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्यात. ते अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनरुज्जीवन समिती सभा, आयोजी करण्यात आली होती. या बैठकीस आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदि उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्यसाठी बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. रोजगारासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग आले पाहिजे, जे उद्योग आहेत ते चांगल्या प्रकारे चालले पाहिजेत. व नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. याकरीता त्यांना आवश्यक असलेल्या रस्ते, वीज व पाणी या मुलभूत, पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महानगरपालिका, विद्युत वितरण कंपनी यांनी तातडीने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. उद्योजकांच्या अडचणी सोडविताना त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्यात. त्याचबरोबर उद्योजकांनीही आपल्या उद्योगात स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उद्योगमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता जिल्ह्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि कौशल्य विकास विभागाच्यावतीने उद्योजकता परिचय कार्यक्रम तसेच रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे. या मेळाव्यांमध्ये तरुणांना उद्योग व रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात यावेत. त्यांना प्रशिक्षित करुन स्वयंरोजगाराकडे वळवावे अशा सुचनाही पालकमंत्री यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.

या बैठकीत दि. इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडिस्ट्रीज संघटना यांनी विद्युत वितरण कंपनी विद्युत भार कमी करणे, अतिरिक्त लावलेले मागणी शुल्क परत न देणे, वीज ग्राहकाची वर्गवारी बदलल्यानंतर फरकाची रक्कम परत न मिळणे, वीज जोडणी वेळेत न मिळणे, लघु उद्योग भारती संघटनेच्यावतीने औद्योगिक वसाहतीमधील बंद पथदिवे सुरु करणे, काशिनाथ हॉटेलकडून एम. सेक्टरकडे जाणेसाठी रस्ता बनविणे, औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या निचरा होण्यासाठी गटारी बांधणे, औरंगाबाद महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आदि विविध विषय बैठकीत उपस्थित केले.

प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. दंडगव्हाळ यांनी केले. तसेच जिल्ह्यात विशाल व मोठे 18 उद्योग असून यामध्ये 8994 इतका रोजगार उपलब्ध असून त्यापैकी 8163 स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे. तर स्क्षुम, लघु व मध्यम 37833 उद्योग असून यामध्ये 1 लाख 46 हजार 637 रोजगार असून त्यापैकी 1 लाख 31 हजार 973 स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आल्याची माहिती दिली.

या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वीज वितरण कंपनी, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग व महामंडळ, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version