Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्यापासून राहुल गांधीही पंजाबमध्ये आंदोलनात सहभागी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ३ ऑक्टोबरपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेदेखील पंजाबमध्ये आंदोलक शेतकऱ्यांसोबत सहभागी होणार आहेत. पंजाब ते दिल्ली अशी ट्रॅक्टर रॅलीचंही आयोजन करण्यात आलंय. या रॅलीमध्ये राहुल गांधी, कॅप्टर अमरिंदर सिंह सहभागी होणार आहेत.

केंद्राकडून मनमानी पद्धतीनं संसदेत मंजूर करून घेण्यात आलेल्या कृषी विषयक विधेयकांविरुद्धचा शेतकऱ्यांत असलेला रोष अद्यापही कमी झालेला नाही. देशातील वेगवेगळ्या भागांत शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत. आज पंजाबमध्येही शेतकऱ्यांनी रेल रोको मोहीम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला उत्तर प्रदेश, दिल्ली नजिकच्या भागांतही कृषी कायद्याचा विरोध दिसून येतोय. हमी भाव देण्याचा मुद्दा विधेयकात समाविष्ट केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय.

‘देशातील मजूर-शेतकरी यांचे परिश्रम आत्मनिर्भरतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यांना कठोर परिश्रमांचा आदर आणि मान मिळायला हवा. जय श्रमिक जय जवान जय किसान’ असं ट्विट करत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त केलाय.

 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही व्हिडिओ संदेश सोशल मीडियावरून जाहीर करताना शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याचं म्हटलंय. मोदी सरकार शेतकऱ्यांना रक्ताचे अश्रू ढाळायला भाग पाडत असल्याची टीका त्यांनी केलीय. शेतकऱ्यांचं संरक्षण कोण करणार, याबद्दल सरकारनं काही विचार केलाय का? असा सवालही त्यांनी विचारलाय.

 

दुसरीकडे पंजाबच्या अमृतसरमध्ये शेतकरी मजूर संघर्ष कमिटीनं नऊ दिवसांपासून सुरू ठेवलेलं आंदोलन कायम ठेवलंय. ५ ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असं आंदोलकांनी स्पष्ट केलंय.

शुक्रवारी आंदोलक शेतकरी हरियाणाकडून दिल्लीकडे निघाले होते. शेतकरी दिल्लीच्या विजय घाटाकडे निघाले असतानाच कुंडली सीमेवर पोलिसांनी या शेतकऱ्यांना रोखून धरलंय. भारतीय शेतकरी युनियनचे राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकाऱ्यांचं एक प्रतिनिधिमंडळ कुंडली सीमेवरून लाल बहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निघालं असताना पोलिसांनी ही कारवाई केलीय. या प्रतिनिधीमंडळात सोनीपतसोबतच पंजाबच्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. आपण लाल बहादूर शास्त्रींच्या समाधी स्थळापर्यंत जाण्यासाठी परवानगी मिळवल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तरीही त्यांना पोलिसांनी रोखून धरलंय.

Exit mobile version