Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिकेची मदतीसाठी आर्त विनवणी

 

मुंबई : वृत्तसंस्था । आधीच कोरोना संकटामुळे आर्थिक स्थिती वाईट असताना वादळाने केलेल्या नुकसानामुळे अनेकांसमोर संकटाचा डोंगर उभा आहे. यामध्ये वसईतील वृद्धाश्रमाचाही समावेश आहे. या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिका वास्तव्यास असून त्यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली आहे.

 

९० वर्षीय सुमन रणदिवे दादरमधील बालमोहन विद्यामंदिरात शिक्षिका होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना त्यांनी शिकवलं आहे. १९९१ मध्ये त्या निवृत्त झाल्या. पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर सुमन रणदिवे यांनी वृद्धाश्रमात आश्रय घेतला. वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ केअर” या वृद्धाश्रमात त्या राहत आहेत.

 

सुमन रणदिवे यांच्यासोबत वृद्धाश्रमात २५ हून अधिक वृद्ध राहतात. तौते चक्रीवादळामुळे असलेल्या वृद्धाश्रमाचे पत्रे उडाले असून इतरही नुकसान झालं आहे. पत्रे उडून गेल्यामुळे सर्व सामान, कपडे, कागदपत्रंही भिजली असून सर्वांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. वादळ जाऊन दहा दिवस झाल्यानंतरही अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. यामुळे सुमन रणदिवे यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.

“चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाचं खूप  नुकसान झालं आहे. छप्पर उडालं असल्याने आम्हाला रात्री झोपायला त्रास होतो. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी शिकवलं होतं. कृपया आम्हाला मदत कर”, अशी आर्त हाक सुमन रणदिवे यांनी दिली आहे.  वृद्धाश्रमाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास आठ ते दहा लाखांचं नुकसान झालं आहे.

Exit mobile version