Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उदयनराजेंची राजीनाम्याची तयारी

मुंबई वृत्तसंस्था । छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण सरकारने केलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असं उदयनराजे म्हणाले आहेत. सर्वांना न्याय मिळत असताना मराठा समाजाने वंचित का राहावं ? अशी विचारणाही यावेळी त्यांना केली.

“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची वेळ आली तर कोणत्याही परिस्थितीत मी राजीनामा देणारच. मग फक्त मराठा नाही तर ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्या सर्वांसाठी मी राजीनामा देणार. काही होत नसेल तर पदावरुन राहून काय उपयोग,” असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

“माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही. कोणताही पक्ष हा लोकांच्या जीवावर असतो. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच करत नाही, मग ते कोणीही असो. मला कोर्टाचा अवमान करण्याची इच्छा नाही. पण कोर्ट म्हणजे काय मला हे कळालंच नाही. कोर्ट म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसंच असतात. निर्णय देताना त्यांनी मनाने विचार केला पाहिजे, त्यांनी सर्वांना न्याय दिला पाहिजे,” असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं आहे.

“श्रेय कोणीच घेऊ नये मग ते कोणीही असो. प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय नाही मिळाला तर उद्रेक होणारच. पण जर तो झाला तर मग त्याला जबाबदार कोण?,” अशी विचारणा उदयनराजेंनी केली आहे. “नेतृत्व कोणीही करावं. पण मुख्य समस्या सोडवली जाणं महत्त्वाचं आहे,” असं ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, “जे माझ्या मनाला पटतं ते मी करणार. मी राजकारणी नाही, राजकारण करणं आपल्याला पटत नाही. अन्याय जिथे होत असेल तिथे मी उतरणार”.

“मराठा आरक्षणावरुन माझी अनेकांशी चर्चा सुरु असून यामध्ये राजकारण आणलं जाऊ नये. इतरांप्रमाणे मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. ओघाने मी मराठा आहे, पण मला तेवढ्यापुरतं मर्यादित ठेऊ नका,” अशी विनंती उदयनराजेंनी केली आहे. “आरक्षण नाही मिळालं तर उद्रेक होईल याची जास्त भीती वाटते,” असं ते म्हणाले आहेत.

Exit mobile version