उत्तर प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री योगी दिल्लीत

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमध्ये  काही दिवसात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

 

योगी  उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत गेल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.  आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे.

 

उत्तर प्रदेश भाजपात असंतोष असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. मात्र पक्षाने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सर्वकाही आलबेल असल्याचं स्पष्ट केलं आहे. या भेटीनंतर आता पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे.

 

 

एनडीएच्या सहयोगी  अपना दल (एस) च्या अध्यक्षा आणि खासदार अनुप्रिया पटेल यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळात आपल्या पक्षाला जास्तीत जास्त स्थान मिळावं यासाठी त्या आग्रही आहेत. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करून दोन मंत्रिपदं द्यावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाला एक राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. जयकिशन जॅकी यांच्याकडे जेल राज्यमंत्रिपद आहे.

 

उत्तर प्रदेश भाजपाचे प्रभारी राधामोहन सिंह यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर फारसं काही झालं नाही . मात्र आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत गेल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि आरएसएस नेत्यांमध्ये बैठकाही सुरु आहेत.

 

Protected Content