उत्तर प्रदेशात भाजपा आमदार हतबल !; पोलीस स्टेशनमध्ये महिनाभर हेलपाटे

 

 

प्रयागराज : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशात भाजपाशासित सरकार असूनही भाजपाच्या आमदाराला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.

 

उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजपा आमदार असलेले राजकुमार अग्रवाल  महिन्याभरापासून एका खासगी रुग्णालयावर तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात हेलपाटे मारत आहे. तिथे त्यांना कुणीही दाद देत नसल्याचं चित्र आहे.  त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मात्र अद्याप त्यांना कुणीही दाद दिलेली नाही.

 

२२ एप्रिलला काकोरीच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मुलाला  दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. २६ एप्रिलला त्यांचा मुलाचा जीव गेला. मुलाचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे. “२६ एप्रिलला मुलांचं ऑक्सिजन लेव्हल ९४ इतकं होतं. तो जेवणही करत होता. संध्याकाळी अचानक डॉक्टरांनी सांगितलं त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. त्याच्यासाठी आम्ही दोन ऑक्सिजन सिलेंडरचा बंदोबस्त केला. मात्र डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलेंडर त्याच्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला”, असा आरोप भाजपा आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे.

 

“त्या दिवशी रुग्णालयात ७ जणांचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार मी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना दिली. मात्र अद्याप माझी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. माझी मागणी आहे की, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावं आणि हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे. उत्तर प्रदेशात मृत्यूंचा आकडा २० हजारांच्या पार गेला आहे. सध्या राज्यात ५२,२४४ सक्रीय रुग्ण आहेत.

 

Protected Content