Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उत्तरप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील पत्रकारांना विमा योजना लागू करा; महाराष्ट्र पत्रकार संघाची मागणी

भडगाव प्रतिनिधी । उत्त्तरप्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पत्रकारांना विमा योजना लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील पत्रकारांचा प्रत्येक वर्षी ५ लाख रूपयांचा आरोग्य विमा उतरविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. तसेच ज्या पत्रकाराचे कोरोनानं निधन होईल त्यांच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील योगी सरकारने घेतला आहे. योगी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र सरकारनं देखील राज्यात अशाच प्रकारची योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पत्रकार विमा योजना सुरू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र पत्रकार संघ सातत्यानं मागणी लावून धरली आहे. याच मागणीसाठी आणि कोरोनानं मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाने १८ सप्टेंबर रोजी राज्यभर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हजारो एसएमएस पाठवून विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना कोरोनानं मृत्युमुखी पडणार्‍या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र दिलेले शब्द सरकारने अजून तरी पाळलेला नाही, तेव्हा सरकारने पत्रकारांचा आता जास्त अंत न पाहता ज्या पत्रकारांचं कोरोनानं निधन झालंय त्यांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात अनेक पत्रकारांचे कोरोना किंवा कोरोनासदृश्य आजारानं निधन झालं आहे. आजही राज्यातील पन्नास पेक्षा जास्त पत्रकार राज्याच्या विविध भागातील रूग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. मात्र सरकारने पत्रकारांसाठी अद्यापही उपचारासाठी विशेष काहीच योजना आखलेली नाही. पत्रकारांसाठी ऑक्सीजन आणि व्हेटिलेटरची सोय असलेले बेड त्वरित उपलब्ध करून द्यावेत ही मागणी देखील सरकारनं अजून पूर्ण केली नाही. तेव्हा सरकारने तातडीने विमा योजना लागू करावी, ५० लाखाची नुकसान भरपाई द्यावी, आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ पाटील, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, उपाध्यक्ष प्रविण ब्राम्हणे, सल्लागार संजय पवार, सुनील कासार, तालुकाध्यक्ष राजू शेख, अशोक परदेशी, संजय पाटील आदिनी केली आहे.

Exit mobile version