Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उच्च शिक्षित विद्यार्थी विविध मागण्यांसाठी मातोश्रीवर पायी धडकणार

 

अहमदनगर, वृत्तसंस्था । मुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेले मातोश्री बंगल्यावर राज्यातील उच्च शिक्षित विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत. नगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून हे विद्यार्थी २ नोव्हेंबर रोजी पायी मुंबईकडे निघणार आहेत.

शिक्षणातील सुलभीकरण आणि त्यानंतर नोकरी व्यावसायासंबंधीच्या सुविधा याविषयीच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. या मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने आता मातोश्रीवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. एक डिसेंबरलाच हा मोर्चा निघणार होता, मात्र या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने तो एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य समन्वयक यशवंत तोडमल यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना पायी मोर्चात येता येणार नाही. ज्या दिवशी भेट मिळेल, त्या दिवशी त्या वाहनाने मुंबईत येणार आहेत. विद्यार्थी मात्र, पायी जाणार आहेत. पहिल्या दिवशी घरून डबा घेऊन जाणार असून त्यानंतर वाटेत गावोगावी थांबून लोकांना आपल्या प्रश्नांची माहिती देत पुढे वाटचाल करणार आहेत. आर्थिक पाठबळ नसल्याने वाटेत गावकऱ्यांनीच आंदोलकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version