Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांच्या जंजाळातून मुक्तता करण्यासाठी आता स्मार्टकार्ड

 

 

अमरावती: वृत्तसंस्था । उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांच्या जंजाळातून मुक्तता करण्यासाठी त्यांना  आता स्मार्टकार्ड   देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले

 

 

परदेशात अथवा राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संपर्कात राहून कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व त्यांचा वेळही वाया जातो. विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी ही घोषणा केली. ‘विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी देश-विदेशात जाताना दस्तऐवजाचं मोठ ओझं सोबत घेऊन फिरावं लागतं. सतत महाविद्यालयाच्या संपर्कात राहावे लागतं. त्यामुळं अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्याचा विचार सुरू आहे,’ असं सामंत यांनी सांगितलं.

 

‘स्मार्ट कार्ड’मध्ये विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीपासून ते सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षापर्यंतची सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे असणार आहेत. त्याशिवाय, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, विविध परीक्षा, ब्लॉगचे विषय, विद्यार्थी कल्याणाच्या योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी सरकारी पातळीवर विचारविनिमय व नियोजन करण्यात येत असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

 

Exit mobile version