इतरांच्या तुलनेत कॉर्बेवॅक्स कोरोना लस स्वस्त मिळणार

 

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था । देशात लवकरच सर्वात स्वस्त करोना लस वापरात येण्याची चिन्ह आहेत. हैदराबादची कंपनी ‘बायोलॉजिकल ई’ची अँटी करोना विषाणू लस ‘कॉर्बेवॅक्स’  लवकरच बाजारात उपलब्ध होऊ शकते.

 

अद्याप या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळालेली नाही. या लसीच्या दोन डोसची किंमत ५०० रुपयांपर्यंत असू शकते. या लशीची फेज ३ क्लिनिकल ट्रायल सध्या सुरू आहे.

 

बायोलॉजिकल ईच्या एमडी महिमा डाटला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीची किंमत अद्याप निश्चित करण्यात आली नसली तरी ही देशातील सर्वात स्वस्त कोरोना लस ठरू शकते. बायोलॉजिकल ईच्या या लशीचं उत्पादन येत्या काही महिन्यांत सुरू होऊ शकतं. ऑगस्ट महिन्यापासून ७.५ ते ८ कोटी डोसचं उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता असल्याचा विश्वासही डाटला यांनी व्यक्त केलाय.

 

जुलै – ऑगस्ट महिन्यात लसीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली तर देशातील लसीची कमतरता या लसीमुळे भरून येऊ शकते. त्यामुळे, देशभरात सुरळीतपणे लसीकरण मोहीम राबवली जाऊ शकते.

 

ही कोरोना लस आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे. यामध्ये SARS-CoV-2 चे रिसेप्टर – बाइंडिंग डोमेनच्या डिमेरिक फॉर्मचा वापर अँटीजेन प्रमाणे वापर केला जातो. लसीची क्षमता वाढवण्यासाठी यात एक अँडज्युवेन्ट CpG 1018 चाही वापर करण्यात आला आहे.

 

कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशींप्रमाणेच  ही लसदेखील दोन डोसमध्ये उपलब्ध होईल. या लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचं राहील. केंद्र सरकारनं कंपनीला आगाऊ १५०० कोटी रुपये देऊन ३० कोटी डोसची आगाऊ खरेदी केली आहे.

 

Protected Content