Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इक्बाल मिर्चीसोबत व्यवहार, प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल कागदपत्रांवर सही करण्यासाठी आज ईडी कार्यालयात होते . पटेल यांची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ते स्वाक्षरी करुन परत निघाले.

 

“खूप दिवसांपूर्वी जी प्रॉपर्टी त्यांनी जप्त केली होती त्याच प्रॉपर्टीच्या कन्फर्मेशनसाठी त्यांना स्वाक्षरी हवी होती. फारसं काही नाही”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

 

वरळी येथे सीजे हाऊस नावाची इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर छोटी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झालाचा संशय ईडीला आहे. पैशांची अफरातफर झाल्याचा बोट ठेवून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

तपास सध्या ईडी करत आहे. ईडीने इक्बाल मिर्चीच्या काही नातेवाईकांना व त्याच्या काही कर्मचाऱ्यांनाही अटक केली आहे. ईडीने इक्बाल मिर्ची याची मालमत्ता देखील जप्त केली आहे. प्रफु्ल्ल पटेल यांनी सीजे हाऊसमधील जी मालमत्ता इक्बाल मिर्चीला दिली होती ती मालमत्ता देखील ईडीने जप्त केली आहे.

 

विधानसभेची 2019 मध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीआधी काही नेत्यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळी प्रफुल्ल यांनी इक्बाल मिर्चीसोबत व्यवहार केल्याचं कबूल केलं होतं. “हो मी मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केला. मी काहीही चुकीचे केलेले नाही. हा जो काही व्यवहार झाला तो कायदेशीररित्या झाला”, असं पटेल म्हणाले होते.

 

मिर्ची हे भारताचे नागरिक आहेत. ते नियमित टॅक्स भरतात. मी 2007 मध्ये सगळी पार्श्वभूमी तपासली होती, त्यांच्याबरोबर व्यवहार करण्यात काही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री केल्यानंतर मी कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. त्यामुळे आमच्या संबंधावर वाद उपस्थित करणे गैर आहे, असंही पटेल म्हणाले होते.

 

Exit mobile version