इंडोनेशियाने हद्दीत घुसलेल्या चीनच्या गस्ती पथकाला पिटाळून लावले

जकार्ता वृत्तसंस्था । दक्षिण चीन समुद्र पुन्हा एकदा तणावाचे केंद्र तयार झाले आहे. चीनच्या वाढत्या आगळीकीला इतर देशांकडूनही उत्तर देण्यास सुरू झाले आहे. इंडोनेशियाने आपल्या हद्दीत घुसलेल्या चीनच्या गस्ती पथकाला पिटाळून लावले आहे. या घटनेनंतर आता दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. चीनकडून पलटवार होण्याची शक्यता गृहित धरून इंडोनेशियाने युद्धनौकांची गस्त वाढवली आहे. या भागात चिनी युद्धनौकांची हालचाल सुरू असल्याचे समोर आले.

याआधी जपानने आपल्या हद्दीत घुसलेल्या चीनच्या पाणबुडीला पिटाळून लावले होते. इंडोनेशियाने चीनच्या गस्ती पथकाला नातुना बेटाजवळून हुसकावून लावले आहे. हा भाग इंडोनेशियाच्या विशेष आर्थिक भागात येतो. इंडोनेशियाच्या समुद्र सुरक्षा यंत्रणांना चीनचे जहाज आपल्या हद्दीत शिरले असल्याची माहिती समजल्यानंतर इडोनेशियाने आपले जहाज चीनच्या या गस्ती जहाजाजवळ पाठवले.

इंडोनेशिया आणि चीनच्या जहाजात एक किलोमीटरच्या अंतरावरून चर्चा झाली. त्यानंतर इंडोनेशियाने चीनच्या जहाजाला त्या परिसरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र, चीनच्या जहाजाने हा भाग आमच्या हद्दीत येत असल्याचे म्हटले. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेऊन इंडोनेशियाच्या जहाजाने चीनच्या जहाजाला पिटाळून लावले.

नातूना बेटांजवळ चीनच्या मासेमारी करणाऱ्या नौका कायम दिसतात. चिनी सरकारकडून या नौका आपला दावा सांगण्यासाठीच पाठवल्या जात असल्याचे म्हटले जाते. या नौकांच्या संरक्षणासाठी चिनी गस्ती पथकाच्या नौका असतात. हा कावा लक्षात आल्यानंतर इंडोनेशियाने आपल्या नौसेनेची गस्त वाढवली.

जुलै महिन्याच्या अखेरीस इंडोनेशियाने नातुना बेटांजवळ मोठ्या प्रमाणावर युद्धसराव केला होता. चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशिया आपल्या क्षमतेत वाढ करत आहे. इंडोनेशियाच्या या युद्धसरावात २४ युद्धनौकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन मिसाइल डिस्ट्रॉयर आणि चार एस्कॉर्ट जहाजांचा समावेश होता. इंडोनेशियाच्या नौदलाने समुद्र आणि जमिनीवर हल्ला करण्याचा सराव केला.

दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्के भागावर चीन आपला दावा सांगत आहे. या समुद्रातील भागाला घेऊन फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि व्हिएतनाम या देशांसोबत वाद आहे. त्याशिवाय, दक्षिण चीन समुद्रात जपानसोबत बेटाच्या हक्कावरून वाद सुरू आहे. अमेरिकेनेही चीनचा या दक्षिण चीन समुद्रातील दावा फेटाळून लावला आहे.

Protected Content