आ मंगेश चव्हाण यांच्यासोबत खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांची बैठक,

 

 

 

चाळीसगाव  : प्रतिनिधी ।  अंत्योदय जनसेवा कार्यालयात चाळीसगाव शहरातील खाजगी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा चालविणाऱ्या डॉक्टरांची आज आमदार मंगेश  चव्हाण यांनी बैठक घेतली

 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी व खाजगी कोविड सेंटरच्या माध्यमातून आपण चांगले काम केले त्यामुळे आपण चाळीसगाव तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो मात्र दुसरी लाट अधिक तीव्र असून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, परिस्थिती गंभीर आहे, सर्व यंत्रणा अडचणीत आहे मात्र  रुग्णांना वैद्यकीय सेवेची गरज आहे त्यामुळे आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत कोरोना विरोधातील लढा आपल्याला सुरु ठेवावा लागेल, लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.

 

शहरातील असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स, संचालित सरकारमान्य खासगी कोविड सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेमडेसिवीरची अनुपलब्धता, मेडिकल ऑक्सीजनची कमतरता या अडचणींमुळे अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करणे जिकिरीचे झाले असून रुग्णांच्या जीवितासही  धोका उत्पन्न होत आहे, त्यामुळे  रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व समाजात उद्रेक झाल्यास  जबाबदार कोण ? वरील समस्यांचे निराकरण करावे अन्यथा खासगी कोविड सेंटर बंद करणे हाच पर्याय राहील असा इशारा चाळीसगाव तालुक्यातील खाजगी कोविड सेंटर चालकांनी  दिला होता.

 

आमदार मंगेश चव्हाण यांनी निवेदनाची  दखल घेत सर्व खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार करंबळेकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती गटनेते संजय  पाटील यांच्यासह डॉ अनिकेत पवार, डॉ कुणाल तलरेजा, डॉ मंगेश वाडेकर, डॉ विनय पाटील, डॉ शैलेंद्र महाले, डॉ रणजीत राजपूत, डॉ संदीप देशमुख, डॉ देवेंद्र पाटील, डॉ नितीन पवानी, डॉ तुषार राठोड, डॉ.अनुराधा खैरनार आदी उपस्थित होते.

 

या  चर्चेत खाजगी कोविड सेंटर डॉक्टरांनी सांगितले की, ड्रग इन्स्पेक्टरकडून रेमडेसिवीर होणारा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात आहे. हॉस्पिटलला दररोज ४० इंजेक्शनची गरज असतांना, २-३ दिवसाआड फक्त ३ ते ४ इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. चाळीसगाव शहरातील कोव्हीड सेंटरला दररोज अंदाजे ४०० जंबो  सिलिंडरची आवश्यकता असतांना, फक्त ४० ते ५०  सिलिंडर   उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

 

आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील ऑक्सिजन पुरवठादार पलक गॅस व गौरी गॅस यांच्या मालकांना बोलावून  त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी  आम्ही जळगाव व औरंगाबाद येथून ऑक्सिजन मागवतो मात्र  ३५० चे  सिलिंडर  ५०० ते ६०० ला मिळत असल्याने अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर आमदार चव्हाण यांनी लवकरच जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन ऑक्सिजन दर निश्चित करण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासन दिले.

 

प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांना कोव्हीड होऊन ६ आठवडे ते ६ महिने झाले आहेत त्यांनी प्लाझ्मा दान करावेत यासाठी अभियान राबविण्याच्या सूचना देखील आमदार चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना केल्या.

Protected Content