Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आसाराम बापूला कोरोना !

 

जयपूर: वृत्तसंस्था । लैंगिक अत्याचार गुन्ह्यात  कारावासाची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला  कोरोनाची लागण झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

 

काही तासांपूर्वीच आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

 

मात्र, त्यानंतरही आसारामची प्रकृती वेगाने खालावत आहे. आसारामच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे आता आसाराम बापूला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. 5 मे रोजी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडत गेली.

 

जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. या ठिकाणी जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातील दवाखान्यात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

 

यापूर्वी 18 फेब्रुवारीला छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणी केल्यानंतर काहीही गंभीर आढळले नाही. त्यामुळे दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. या घटनेवेळी आसाराम बापूचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जेलच्या बाहेर जमले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राजस्थानलाही कोरोनाचा विळखा घातला आहे. राजस्थानमध्ये काल दिवसभरात 16 हजार 815 नवीन कोरोनाबाधित आढळले. ही मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात आढळलेली सर्वात कमी आकडेवारी आहे. दुसरीकडे काल दिवसभरात सर्वाधिक 17,022 रुग्ण बरे झाले आहेत. वैद्यकीय विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोना मृत्यूची संख्या चिंताजनक बनली आहे. बुधवारी राज्यात 155 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात एकूण मृत्यूची संख्या 5021 झाली आहे.

Exit mobile version