Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आसाम – मिझोराम संघर्षात ५ पोलीस शाहिद

 

 

गुवाहाटी : वृत्तसंस्था । आसाम आणि मिझोराम या पूर्वेकडच्या दोन राज्यांच्या सीमारेषेवर  तुफान गोळीबार झाला.  ५ पोलीस शहीद झाले असून मराठी आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर हे पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत.

 

या घटनेवरून सध्या राष्ट्रीय राजकारणात चर्चा सुरू झाली असून त्यावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी खुलासा केला आहे. “सीमेवर गोळीबार सुरू असताना मी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांना ६ वेळा फोन केला होता. ते म्हणाले सॉरी”, असं हिमंत बिस्व सर्मा यांनी सांगितलं आहे.   “आमच्या भागाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, पोलीस आमच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी तैनात आहेत”, असं देखील सर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

 

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी यावेळी या वादावर आसाम सरकारची नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट केलं आहे. “गोळीबार सुरू असताना मी ६ वेळा मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. ते म्हणाले ‘सॉरी’ आणि त्यांनी मला ऐझवलला चर्चेसाठी निमंत्रित केलं. आमच्या जमिनीचा एक इंचही कुणी घेऊ शकणार नाही. आमच्या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. सीमारेषेवर पोलीस तैनात आहेत”, असं ते म्हणाले.

 

यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं हिंमत बिस्व सर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. “वादग्रस्त भाग हा वनक्षेत्रात येतो. सॅटेलाईट इमेजच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता की किती अतिक्रमण या भागात झालेलं आहे. त्यामुळे आसाम सरकारने आता असा निर्णय घेतला आहे की यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायची”, असं सर्मा म्हणाले. दरम्यान, या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये तर जखमींना १ लाख रुपये देण्यात येतील, असं देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं.

 

आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. याच वादातून सोमवारी पुन्हा एकदा सीमेवर संघर्षाचा उद्रेक झाला. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले. यामध्ये झालेल्या गोळीबारात आसामचे ५ पोलीस शहीद झाले आहेत. मूळचे महाराष्ट्राचे असलेले वैभव निंबाळकर हे जखमी झाले आहेत.

 

हिमंता बिस्व सर्मा यांनी मिझोरामच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “हा काही राजकीय मुद्दा नाही. दोन राज्यांमधली ही सीमेसंदर्भातली समस्या आहे. हा अनेक वर्षांपासून चालत आलेला वाद आहे. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचंच सरकार असतानापासून हा वाद आहे. त्यामुळे हा वाद दोन राजकीय पक्षांमधला नसून दोन राज्यांमधला आहे”, असं सर्मा म्हणाले. “वाद असलेली भूमी ही राखीव वनक्षेत्र आहे. अशा ठिकाणी वसाहत होऊ शकते का? हा वाद जमिनीविषयी नसून जंगलाविषयी आहे. आसामला आपलं जंगल सुरक्षित ठेवायचं आहे. आम्हाला तिथे कोणतीही वसाहत तयार करायची नाही”, असं देखील सर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Exit mobile version