Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताई पालखी सोहळ्यास परवानगी द्यावी – ॲड. रविंद्रभैय्या पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीनिमित्त पालखी मुक्ताई पालखी सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी संत मुक्ताबाई संस्थांच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पालखी सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी मागणी केली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त परंपरेने चालत आलेल्या आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या ७ प्रमुख पालख्या त्या त्या संतांच्या समाधी स्थळावरून प्रस्थान करत असतात. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून सर्वात प्रथम आदिशक्ती संत मुक्ताबाईची पालखी प्रस्थान करत ७५० कीमीचा ३४ दिवस पायी प्रवास करत ही पंढरपूरमध्ये दाखल होते. संत मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याला ३१० वर्षाची अविरत परंपरा असून या पालखी सोहळ्यात वैष्णवांचा मेळा मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने ३१० वर्षाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या नियमावलीत पालखी सोहळ्यास परवानगी मिळावी यासाठी संत मुक्ताई संस्थानच्या वतीने विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याशी संस्थानचे अध्यक्ष ए रवींद्र पाटील तसेच मुक्ताई संस्थानचे व्यवस्थापक हभप रवींद्र हरणे महाराज यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

संत मुक्ताबाई च्या पालखी सोहळ्याची तीनशे दहा वर्षांची अविरत परंपरा खंडित होऊ नये म्हणून कोरोना प्रादुर्भाव प्रशासनाच्या नियमावली लक्षात घेत १० वारकरी गाडी द्वारे तर पाच वारकरी पायी असा प्रस्ताव संस्थांच्या वतीने विरोधी पक्ष नेत्यांकडे मांडण्यात आला. या प्रस्तावात जर मान्यता मिळाली तर २७ मे रोजी आदिशक्ती संत मुक्ताबाई ची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूकडे ५  वारकरी समवेत पायी प्रस्थान करणार आहे .

Exit mobile version