Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार !

 

पाचोरा, प्रतिनिधी । आदिवासी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वाभिमानी शिक्षक – शिक्षकेतर संघटनेने जळगाव येथे आदिवासी विकासमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी अनुदानित आश्रमशाळांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

अनुदानित आश्रमशाळा ह्या दऱ्याखोऱ्यातील तसेच वाड्या-वस्त्यावरील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. मात्र आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांचाही अनेक समस्या असतात. या समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी शिक्षक – शिक्षकेतर संघटनेने आदिवासी विकासमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मंत्रालय स्तरावरील सर्व प्रश्न सोडणार असल्याचे मंत्र्यांनी आश्र्वासित केले आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख उत्तमराव मनगटे यांनी माध्यमांना दिली आहे.

या मागण्या होणार मान्य
अतिरिक्त तुकडी सुधारित आदेश करणे, नियमित पगार करणे, १ हजार १५५ कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रश्न निकालात काढणे, प्रयोगशाळा परिचर वेतनश्रेणी, अधिक्षक व अधिक्षिका यांच्यातील वेतन श्रेणी तफावत दूर करणे, लिपीक संवर्ग पदोन्नती बाबत, आश्वासित योजना तात्काळ अंमलबजावणी करणे, सहावा वेतन आयोग (डी.सी.पी.एस.) हिशोब मिळणे, पहारेकरी यांना वेतन श्रेणी लागू करणे आदी विषयाचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे हिरालाल पवार, विजय कचवे, संभाजी पाटील, संजय अलोने, आबा पाटील, बद्रीप्रसाद चौधरी, प्रमोद पाटील भुषण पाटील राजेंद्र जाधव, संदीप पाटील, प्रविण पाटील, किरण पाटील, भालचंद्र पवार, भूपेंद्र पाटील उपस्थित होते.

Exit mobile version