Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आशा फौंडेशनच्या सूत्रसंचालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमास विद्यापीठाची मान्यता

जळगाव, प्रतिनिधी | येथील आशा फौंडेशन या संस्थेच्या सूत्रसंचालन: संकल्पना, साधना आणि सराव प्रमाणपत्र अभ्यासक्रमास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने मान्यता दिली आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून आठवड्यातून दोन दिवस तीन तास या अभ्यासक्रमास सुरवात होत आहे. जास्तीत जास्त इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक गिरीश कुळकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सध्याच्या वेगवान युगात सादरीकरणास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कुठलाही कार्यक्रम सूत्रबद्ध करण्याचे कौशल्याचे काम सूत्रसंचालकास करावे लागते. सूत्रसंचालन हि कला तर आहेच मात्र ते एक शास्त्रही आहे. सूत्रसंचालनाचे कौशल्य अवगत करण्यासाठी कलेची साधना, शास्त्राचा अभ्यास आणि प्रात्यक्षिकांसह सराव आवश्यक ठरतो. त्यासाठीचा हा अभ्यासक्रम असून तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचे त्यासाठी मार्गदर्शन लाभणार आहे. सूत्रसंचालनामुळे करिअरची एक विशेष संधी आजच्या युवकांना उपलब्ध आहे. त्यासाठी अभ्यासक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. ३० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास विद्यापीठाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आशा फौंडेशनच्या महाबळ कॉलनीतील कार्यालयात संपर्क साधावा असेही पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version