Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य भारती व योगशिक्षक महासंघातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात जागतिक तंबाखू विरोधी दिनाबाबत जनजागृतीसाठी आरोग्य भारती आणि अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले.  यावेळी विविध तज्ञ डॉक्टर आणि योगतज्ञ एकत्र येऊन तंबाखू विरोधी फलक घेऊन शांततामय मार्गाने समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅॅलीत सहभागी सदस्यांच्या हातात असलेले तंबाखू विरोधी फलक हे जनतेला आकर्षित करत होते. रॅलीत कुठलीही घोषणा देण्यात आली नाही सर्वांनी अतिशय संयमाने रॅलीत सहभागी होऊन आवाज न करता तंबाखू प्रेमींचे कान उघडण्याचा प्रयत्न केला. आज भारतात तंबाखू आणि वाईट व्यसनांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या उच्च स्तरावर पोहचली आहे. अनेक युवकांचा व्यसनांमुळे नाहक बळी पडत आहे. या व्यसनांच्या विळख्यातून समाजाची सुटका करण्यासाठी अनेक डॉक्टर आणि योगतज्ञ एकत्र आले हे विशेष.

आरोग्य भारती आणि अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे ‘समाजाच्या आरोग्यासाठी झटणे’ हे एकच ध्येय असल्याने या राष्ट्रीय स्तरावरील या दोन संघटना एकत्र आल्या. या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. प्रवीण महाजन यांना ‘महाविद्यालय आणि शाळेच्या पाचशे मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घालावी’ या आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आरोग्य भारतीच्या अध्यक्षा डॉ. लीना पाटील, डॉ. पुष्कर महाजन, डॉ.कल्पेश गांधी, अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील गुरव, उपाध्यक्षा स्वाती निकम, डॉ. भावना चौधरी, चित्रा महाजन, पांडुरंग सोनार, अर्चना गुरव, नेहा तळेले, सोनाली पाटील, ललिता झवर, विजय जाधव, निलेश वाघ, सागर साळी, रोहन चौधरी, कृणाल महाजन, सागर पाटील, अश्विनी तायडे आदि डॉक्टर आणि योगतज्ञ उपस्थित होते.

Exit mobile version