Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य भारतीच्या वतीने ‘आरोग्याचा शंखनाद’ कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आरोग्य भारती शाखेच्या वतीने धन्वंतरी पूजन आणि शंखनाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी धनत्रयदशीला भगवान धन्वंतरी यांच्याप्रत कृतज्ञता भाव म्हणून धन्वंतरी पूजन कार्यक्रम करण्यात येतो. मागील वर्षी धन्वंतरी आणि आरोग्याचे महत्त्व लक्षात घेता विविध शाळांमध्ये शिक्षकांसाठी व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ‘आरोग्याचा शंखनाद’ या उपक्रमांतर्गत शंखनाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर आरोग्य भारती, जळगावच्या अध्यक्षा डॉ. लीना पाटील, फुफ्फुस विकार तज्ञ डॉ. कल्पेश गांधी, योगाचार्य कृणाल महाजन आणि परीक्षक म्हणून खाशाबा महाविद्यायाचे ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले त्यानंतर डॉ. रवींद्र माळी यांनी धन्वंतरी स्तवन करून कार्यक्रमाला प्रारंभ करून दिला. स्पर्धा सुरु करण्यागोदर कृणाल महाजन यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यानंतर डॉ. लीना पाटील यांनी आरोग्य भारतीच्या कार्याची माहिती दिली.

शंखनाद स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली होती आणि एकूण ३५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाला दोन वेळेस शंखनाद करण्याची संधी होती जो स्पर्धक जास्त कालावधीसाठी शंखनाद करेल तो विजेता या नियमानुसार दोन्ही गटात तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती. पहिला गट हा ०५ ते २५ वयोगटातील स्पर्धकांसाठी होता यात प्रथम पारितोषिक अथर्व पाटील, द्वितीय पारितोषिक नमन खंडेलवाल तर तृतीय पारितोषिक मांगल्य जोशी यांनी प्राप्त केले.

द्वितीय गट हा वय वर्षे २५ च्या पुढील स्पर्धकांसाठी खुला होता. यात प्रथम पारितोषिक वरणगाव येथील डॉ. रवींद्र माळी यांना प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक प्रा. इच्छाराम पाटील आणि तृतीय पारितोषिक निलेश वाघ आणि योगेश चौधरी यांना विभागून देण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात परीक्षक हितेश ब्रिजवासी आणि डॉ. कल्पेश गांधी यांनी मार्गदर्शन करत शंखनादाचे आरोग्यातील महत्त्व विषद केले.

सदर कार्यक्रमात आरोग्य भारतीचे सचिव डॉ. विनित नाईक, विजय जाधव, सोनाली पाटील, पल्लवी उपासनी, डॉ. पुष्कर महाजन, डॉ. शरयू विसपुते, सौ.रेवती याज्ञिक, आदींचे सहकार्य लाभले.

Exit mobile version