Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस घेण्याचे टोपे यांचे आवाहन

मुंबई: वृत्तसंस्था । आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी, यासाठी मी त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्याने लस घेतली की मी घेतो, अशी मानसिकता दिसून येत आहे. मात्र, त्यांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे लस सुरक्षित असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचेल, असे मत टोपे यांनी व्यक्त केले.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेविषयी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही कोरोनाची लस कधी घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा टोपे यांनी माझी वेळ आल्यावर मी लस घेईन, असे स्पष्ट केले. केंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत: त्यासाठी पुढाकार घेईन. पण सध्याच्या नियमांनुसार आमचा टर्न नंतर आहे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्याचे ठरवल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात लसीकरणाचा टक्का कमी नाही. सध्याच्या परिस्थितीसाठी दोन प्रमुख गोष्टी कारणीभूत आहेत. लसीकरणासाठीच्या कोव्हिन अ‍ॅपमध्ये सुधारणा सुरु असल्यामुळे अडथळा येत आहे. तसेच आठवड्यातून केवळ चार दिवस लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे फक्त लसीकरणाच्या टक्केवारीकडे पाहू नये, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोव्हॅक्सीन लस घेण्यास नकार दिला जात आहे.

मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जे.जे. रुग्णालय हे कोव्हॅक्सीन लसीकरणाचे शहरातील एकमेव केंद्र आहे. मंगळवारी याठिकाणी १०० जणांना लस दिली जाणे अपेक्षित होते. मात्र, यापैकी केवळ १३ आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी आले. तेदेखील रुग्णालयातील कर्मचारीच होते.

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी दिली होती.

Exit mobile version