Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरबीआयचा दिलासा : कर्ज भरण्याची मुदत ऑगस्टपर्यंत वाढवली

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकट काळात रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आज रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे घोषीत केले. रेपो रेट कमी करण्याबरोबर कर्जदारांना त्यांनी मोठा दिलासा दिला.सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझं वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.

 

बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा आरबीआयने निर्धारित वेळापत्रकापूर्वी रेपो दराची घोषणा केली. ६ जून रोजी पतधोरण जाहीर होणार होते. मात्र त्याआधीच व्याजदर कपात करून बँकेने सामान्य कर्जदारांना दिलासा दिला. याआधी मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. आता आणखी तीन महिने म्हणजेच जून, जुलै आणि आॅगस्ट असे तीन महिने कर्जदारांची ईएमआय मधून तात्पुरती सुटका होईल. कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले होते. यात विविध क्षेत्रांना २० लाख कोटींची मदत योजनांमधून केली होती. लॉकडाउनमुळे वस्तूंचा खप कमी झाला आहे. आता विक्रीला चालना देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने जीडीपीच्या ३.२ टक्के निधी अर्थव्यवस्थेत उपलब्ध केला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभर उद्योगांची दिवाळखोरी आणि नादारी विधेयकातून सुटका केली असल्याचे त्यांनी सांगितले. निर्यात ३० वर्षातील नीचांकी स्तरावर आहे.

Exit mobile version