Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; दुसरा गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी । कामाच्या निमित्ताने दुचाकीने जाणाऱ्या दोन्ही भावांचा मागून येणाऱ्या आयशरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास विद्यापीठासमोर घडली. जखमीस शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महेंद्र रमेश पाटील (वय-३६) आणि प्रल्हाद रमेश पाटील (वय-३०) दोन्ही रा. पाळधी ता.धरणगाव जि.जळगाव हे दोन्ही चहा पावडरचा खेडोपाडी जावून व्यवसाय करतात. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास बांभोरी येथे कामाच्या निमित्ताने दोघे सोबत वेगवेगळ्या दुचाकीने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या गेट समोरून जात असतांना परप्रांतियांना घेवून जाणाऱ्या आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात महेंद्र पाटील जागीच ठार झाला तर प्रल्हाद पाटील हा गंभीर जखमी झाला. अपघात होता परिसरातील नागरीक व महामार्गावरील वाहनधारकांनी धाव घेतली. जखमी प्रल्हाद पाटील याला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मयत महेंद्रचा मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात दोन भाऊ, आई-वडील असा परीवार आहे. अपघातप्रकरणी पाळधी आऊट पोस्ट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, आयशरने धडक दिल्याने एक ठार झाला आहे हे पाहून आयशरने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेने वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version