आयटीबीपीच्या नऊ सदस्यांचा ‘गंगोत्री-२’ शिखरावर तिरंगा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या नऊ सदस्यांच्या पर्वतारोही टीमनं उत्तराखंडातील ‘गंगोत्री-२’ शिखरावर तिरंगा फडकावलाय. कोरोना काळातील आयटीबीपी टीमचं ही दुसरी यशस्वी मोहीम ठरलीय.

गंगोत्री – २ शिखराची उंची २१,६१५ फूट आहे. स्थानिक मुख्यालय आयटीबीपी देहरादूनच्या टीमनं ही मोहीम आखली होती. टीमनं ९ सप्टेंबर रोजी उत्तरकाशीपासून या चढाई मोहिमेला सुरुवात केली होती. २६ सप्टेंबर रोजी सगळ्या म्हणजेच नऊ सदस्यांनी बर्फानं आच्छादलेल्या गंगोत्री-२ च्या शिखरावर यशस्वीरित्या चढाई पूर्ण करत अभिमानानं तिरंगा फडकावला.

आयटीबीपीच्या या गटाचं नेतृत्व उपसेनानी दिपेंद्र सिंह मान यांनी केलं. असिस्टंट कमांडन्ट भीम सिंह उपनेते होते. चढाई करणाऱ्यांत हेड कॉन्स्टेबल राजेश चंद्र रमोला, कॉन्स्टेबल प्रदीप पवार, सतेंदर कुंडी, हरेंदर सिंह, अशोक सिंह राणा, अरुण आणि गोविंद प्रसाद यांचा समावेश होता.

आयटीबीपीच्या पर्वतारोही गटात ५६ सदस्य आहेत. यापूर्वी ३१ ऑगस्ट २०२० रोजी आयटीबीपीनं हिमाचल प्रदेशातील लियो परगिल शिखरावर यशस्वी चढाई केली होती. आयटीबीपीनं आत्तापर्यंत २१४ हून अधिक टेकड्या सर केल्यात. हा पर्वतारोही दलाचा एक अद्वितीय रेकॉर्ड आहे. आयटीबीपी जवान दुर्गम भागातील टेकड्यांवर देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.

 

Protected Content