Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयएमएची योगगुरु रामदेव यांना १ हजार कोटींची नोटीस

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता आयएमएच्या उत्तराखंड शाखेनं योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई द्यावी लागेल, असं या नोटीसीमध्ये सांगण्यात आलं आहे.

 

योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल असं यात सांगण्यात आलं आहे.

 

योगगुरु रामदेव यांना समोरासमोर बसवून प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार असल्याचं आयएमए उत्तराखंड शाखेचे सचिव डॉ. अजय खन्ना यांनी सांगितलं. “योगगुरु रामदेव यांना अ‍ॅलोपॅथीबद्दल जराही ज्ञान नसून तोंडात जे येईल ते बरळत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे आमचं मानसिक खच्चीकरण होत आहे. कोरोनाकाळात आम्ही दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहोत. योगगुरु रामदेव तथ्यहीन दावे करत आहे. यासाठी नोबेल पुरस्कार दिला पाहीजे”, अशी खोचक टीका आयएमए उत्तराखंड शाखेचे सचिव डॉ़. अजय खन्ना यांनी केली. आयएमए उत्तराखंड शाखेने यापूर्वी योगगुरु रामदेव यांच्याविरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यादव यांनाही पत्र लिहीलं होतं.

 

अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेलं वादग्रस्त विधान मागे घेतल्यानंतर योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी औषध कंपन्या आणि इंडियन मेडिकल असोसिएशला २५ प्रश्न विचारले होते. काही आजारांवर ठोस उपाय आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले होते. अ‍ॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणं योग्य वाटत नाही, असा टोलाही हाणला होता. थॉयरॉइड, ऑर्थरायटीस, कोलायटिस, दमा आणि हेपेटायसिस यासारख्या आजारांवर एक एक करत त्यांनी २५ प्रश्न विचारले होते. या प्रश्नाचं पत्रक त्यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे.

 

योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत कोरोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांच्या वक्तव्याप्रकरणी संताप व्यक्त करत विधान मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर योगगुरु रामदेव यांनी विधान मागे घेतलं होतं. मात्र वाद शमण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसत आहे.

 

Exit mobile version