Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयएमआर महाविद्यालयात मुलाखत तंत्र कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आयएमआर महाविद्यालयात एमबीए च्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखत तंत्र आणि त्याचे प्रात्यक्षिके यावर कार्यशाळा घेण्यात आली. हि एकदिवसीय कार्यशाळा संस्थेने गोखले ऍडवान्सड ट्रेनिंग इन्स्टिटयूट जळगाव यांच्या सोबतीने आयोजित केलेली होती.

एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांसाठी शिकत असताना प्लेसमेंट हि सर्वाधिक प्राधान्य असलेली बाब असते. संस्था विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी सर्वोतोपरीने प्रयत्न करते. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांना प्लेसमेंटसाठी आमंत्रित करीत असते. प्लेसमेंटसाठी आलेल्या कंपन्यांचे एच. आर. मॅनेजर मुलाखतींच्या माध्यमातून विविध पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड करीत असतात. पुस्तकी ज्ञानात पुढे असलेला आपला विद्यार्थी मुलाखत तंत्रात मात्र अडखडतो. त्यातूनच त्याची नोकरीसाठी होणारी निवडही संकटात येते. ह्या सर्व बाबींचा विचार करून संस्थेने ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

गोखले ऍडवान्सड ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे संचालक देवदत्त गोखले यांनी हि कार्यशाळेत मार्गदर्शन केले. नोकरीसाठी मुलाखतीला सामोरे जाताना काय तयारी केली पाहिजे, मुलाखतीसाठी जाताना आपले राहणीमान विशेषतः कपडे कसे असले पाहिजेत, कोणत्या प्रश्नांवर विचार केला पाहिजे, आपला रेसुमे कसा असला पाहिजे, प्रेसेंटेशन आणि हावभाव कसे असले पाहिजेत, मुलाखतीदरम्यान काय केले पाहिजे आणि काय करू नये, ह्याचे सखोल विश्लेषण श्री. गोखले यांनी ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले.

ह्या सर्व गोष्टी केवळ तोंडी न ठेवता त्याचे प्रात्यक्षिक श्री गोखले यांनी करून दाखविले. कार्यशाळेतल्या काही निवडक विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीही त्यांनी घेऊन दाखविल्या. ह्या मुलाखतीतुन विद्यार्थ्यांना समोरचा आपला वर्गमित्र मुलाखतीला कसा सामोरा जातोय किंवा काय चुका करतोय? आपण त्यातून काय शिकले पाहिजे? मुलाखत देताना काय टाळले पाहिजे? याचे प्रत्यक्षात अवलोकन करता आले.

ह्या कार्यशाळेच्या आयोजनामुळे मुलाखतीचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकायला मिळाले आणि त्यातून आमचा आत्मविश्वासही वाढला असे समाधानकारक मत कार्यशाळेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाने ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तर समन्वयक म्हणून प्रा. अनिलकुमार मार्थी यांनी जबाबदारी पार पाडली.

Exit mobile version