Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आम आदमी पार्टी गुजरातसह सहा राज्यांची निवडणूक लढवणार

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । आम आदमी पार्टीचे संयोजक आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन वर्षांमध्ये सहा राज्यातील निवडणुका लढवण्याची घोषणा केली.

आम आदमी पक्ष आता दिल्लीच्या बाहेर कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार करत असल्याचं दिसून येतेय. आम आदमी पक्ष उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुका लढवणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. आम आदमी पक्षाच्या नवव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल बोलत होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले, देशातील इतर राजकीय पक्षांकडे विकासाची दृष्टी नाही. ते सर्व पक्ष भूतकाळाविषयी बोलतात. आप ही एकच पार्टी आहे जी भविष्याविषयी विचार करते. आपकडे २१ व्या आणि २२ व्या शतकाची दृष्टी आहे, असं केजरीवाल म्हणाले.

गेल्या ७० वर्षात इतर राजकीय पक्षांना जे जमलं नाही ते आपण फक्त ५ वर्षांमध्ये करुन दाखवलं असं, केजरीवाल म्हणाले. पक्षाला स्थानिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा, असं अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या सदस्यांना सांगितले. पक्षाचा विस्तार देशात गावपातळीपर्यंत करा, अंस आवाहन केजरीवालांनी केले. लवकरच पक्ष संघटना मजबूत केल जाणार आहे. संपूर्ण देश आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपला देशाच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षाला गाव पातळीवर न्या, असं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षानंही महाराष्ट्र राज्यात विविध ग्रामपंचायतीमध्ये मिळून १४५ सदस्य निवडून आणले आहेत. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ या गावासह अन्य तीन गावांमध्ये एकहाती सत्ताही मिळवली आहे.

Exit mobile version