Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आम्ही मुस्लिमांना आरक्षण देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी हिंमतीने सांगावं : फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) आम्ही ५ टक्के मुस्लिम आरक्षण देणार नाही. धर्माच्या आधारावरील आरक्षण संविधानाला मान्य नाही. मुस्लिम आरक्षणाला आमचा विरोध असून, आम्ही ते आरक्षण देणार नाही असे हिमतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विरोधीपक्षाने आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दावरुन सभात्याग केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.

 

मुस्लिम आरक्षणाचा विषय अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे व्यर्थ असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिले आहे. शिवसेनेने मुस्लिम आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच विधानपरिषदेच्या चर्चेत शासनाच्यावतीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 5 टक्के मुस्लिम आरक्षण देणार ही घोषणा केली. त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मत वेगळं असेल तर पत्रकार परिषदेत त्यांनी बोलून ते स्पष्ट होत नाही. विधानसभेत नियम २९३ च्या अंतर्गत विरोधीपक्षाच्यावतीनं आम्ही चर्चा उपस्थित केली होती व मागण्या केल्या होत्या, की अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ हजार रुपये हेक्टरी मदत करू आणि फळबागांना ५० हजार रुपये हेक्टरी अशा प्रकारची घोषणा केली होती. परंतु, त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. एक नवा पैसा देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही. या बद्दल राज्य सरकारच्यावतीनं आजही कुठलही आश्वासन न देता अक्षरशा शेतकऱ्यांचा वचनभंग करण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारने केले असल्याचेही फडणवीस म्हटले.

Exit mobile version