Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आम्हीही पैसे देतो, केंद्राने लस द्यावी ; मुंबईच्या महापौर भडकल्या

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । केंद्र सरकार खासगी क्षेत्राला पैसे घेऊन देत आहे. त्याप्रमाणे राज्य आणि महापालिकेला लस पुरवठा करावा, आम्हीही पैसे देतो. लोकांना लस मोफत देतोय,” असं म्हणत महापौर किशोरी  पेडणेकर यांनी केंद्रावर निशाणा साधला.

 

राज्यात आणि देशात सध्या लशींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे ४५ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण करण्यातही तुटवड्यामुळे विघ्न येत आहेत. तर खासगी क्षेत्रात लसीकरण विनाअडथळा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. या मुद्द्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बोट ठेवलं आहे.

 

महापौर पेडणेकर म्हणाल्या,”मला अशी माहिती मिळाली आहे की, खासगी रुग्णालये केंद्राकडून विकत घेऊन लसीकरण करत आहेत. त्यांच्याकडून लस घेण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत आहेत. महापालिकेकडे तसं नाही. महापालिका लोकांना मोफत लस देत आहे आणि मोफतच देणार. आम्ही केंद्राला लशींसाठी पैसे द्यायला तयार आहोत, पण तो पुरवठा महापालिकेला मिळत नाही. केंद्राकडून ज्याप्रमाणे खासगी क्षेत्राला लस पुरवली जात आहे, त्याचप्रमाणे त्याच किमतीत आम्हाला लस द्यावी. राज्य सरकार, महानगरपालिका पैसे देऊन लस खरेदीसाठी तयार आहे,” असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.

 

 

कुणी एक हजार रुपयाला, कुणी १२००, तर कुणी १८०० ला लस विकत आहेत. गरीब-श्रीमंत भेदभाव न करता सगळ्या मुंबईकरांना लस देतोय. लशींसाठी केंद्राला पैसे द्यायला तयार आहोत, मुख्यमंत्र्यांनीही १२ कोटी डोसची किंमत  एकरकमी देण्याची तयारी दाखवली आहे. पण   सगळा संभ्रम आहे. महापालिकेला ज्यावेळीही लस मिळाली, सगळी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. लोकांना मोफत लस दिली गेली,” अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

 

Exit mobile version