आम्हालाही हर्बल तंबाखू लागवडीची परवानगी द्या : खोत यांची मागणी

मुंबई प्रतिनिधी | नवाब मलीक यांनी आपल्या जावयाकडे गांजा नव्हे तर हर्बल तंबाखू आढळले होते असा दावा केल्यानंतर आता सदाभाऊ खोत यांनी आपल्यालाही हर्बल तंबाखू लागवडीची परवानगी द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

 

माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी आज राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे काहीतरी गांजा सापडला. यावर पवार साहेब म्हणाले की ती हर्बल वनस्पतीयुक्त तंबाखू होती. तो काही गांजा नव्हता, अशा प्रकारचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं. म्हणून मी पवार यांना पत्र लिहिलं आहे. त्यात मी ती हर्बलयुक्त वनस्पतीपासून बनणारी तंबाखू आहे तिचं बियाणं कुठं मिळतं? त्याचं बियाणं आम्हाला तुम्ही उपलब्ध करुन द्या कारण तुम्ही आता त्याला मान्यता दिलीय. म्हणजे या राज्यातील शेतकरी आता त्याची पेरणी करेल. जसा यातून नवाब मलिक यांचा जावई श्रीमंत झाला तशी श्रीमंती राज्यातील शेतकर्‍याला येईल. त्यामुळे या राज्यातील शेतकरी चिंतामुक्त होईल. मुख्यमंत्री सांगतात की मला शेतकरी चिंतामुक्त करायचा आहे. तर मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की आता संधी आलीय चिंतामुक्त करायची, असं उपरोधिक वक्तव्य खोत यांनी केले आहे. खोत पुढे म्हणाले की, पवार यांना जाणते राजे म्हटलं जातं. राज्यात मागील काही काळामध्ये महापूर, अतीवृष्टीमुळे शेतकरी कोलमडलेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. काही ठिकाणी शेतकर्‍यांनी सरकारकडे अशी विनंती केलीय की आमच्या शेतात गांजा लावायला परवानगी द्या, कारण शेती परवडत नाही, असं खोत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. याच गांजा लागवडीच्या मागीच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी बियाणं पुरवण्याची मागणी करणारं पत्र पवारांना लिहिलं आहे.

Protected Content