Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार रोहित पवारांचा राज ठाकरेंना आडवा दणका

 

पुणे : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राजसाहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!” असे रोहित पवार म्हणाले आहेत .

 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा अर्थ सांगितला आहे. यावेळी रोहित पवारांनी भाजपाला देखील चिमटा काढला आहे.

 

रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो.”

 

राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते. “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं होतं.

 

प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचण्याचा सल्ला देणारे शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंनी आपल्या आधीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. “मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं. एका चॅनलला मी मुलाखत दिली. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावलं आणि गमावलं याचा उहापोह त्यात होता. मी त्यांना हेच सांगितलं की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती”, असं राज ठाकरे म्हणाले.

 

“जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही असं करता येणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार देखील मी वाचले आहेत”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 

 

Exit mobile version