Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता झाल्याची भाजपची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता असून त्यांना शोधून काढा अशी तक्रार भाजपाने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

 

भाजपा प्रवक्ते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी ही तक्रार केली असून यावेळी आंदोलनदेखील करण्यात आलं. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर ‘आमदार झाले मिस्टर इंडिया’ अशी पोस्टरबाजी करत आमदारांना शोधून द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रताप सरनाईकांना मातोश्रीत लपवलं आहे असा  आरोप केला आहे.

 

ठाण्यातील वर्तकनगर येथे किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत साखळी आंदोलन केलं. ओवळा माजिवडा मतदार क्षेत्रातील आमदार प्रताप सरनाईक हे गेले अनेक दिवस अज्ञातवासात आहेत. ते हरवल्याची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरे आले होते.

 

“१०० दिवस झाले असून प्रताप सरनाईक गायब आहेत. आम्हाला कोणीतरी ते मातोश्रीत जाऊन लपले असल्याचं सागितलं आहे. म्हणून आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार गायब झाल्याची तक्रार देण्यासाठी आलो आहेत. प्रताप सरनाईक मातोश्रीवर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

घोटाळेबाज आमदाराला लपवण्याचं काम करत आहेत याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनाही विचारायचं असल्याचं ते म्हणाले आहेत.

 

 

Exit mobile version